पुणे : रामकुमार रामनाथन आणि युकी भांबरी या नव्या दमाच्या खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताने वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडचा ४-१ने धुव्वा उडविला. रविवारी रामकुमारने फिन टिअर्नीला सहजपणे पराभूत करताच भारताने ५ सामन्याच्या मालिकेत ३-१ने विजयी आघाडी घेतली होती. त्यानंतर युकीने जोस स्टॅथमला नमवून लिएंडर पेसच्या दुहेरीतील पराभवाचे दु:ख कमी केले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस स्टेडियमवर आशिया-ओशनिया अ गटातील ही लढत झाली. परतीच्या पहिल्या एकेरीत रामकुमारने टिअर्नीचा प्रतिकार ७-५, ६-१, ६-०ने संपवून लढतीचा फैसला भारताच्या बाजूने केला. रामकुमारने विजय मिळविताना भारतीय संघांतील खेळाडूंसह स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला. विजयी आघाडी निश्चित झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी रामकुमारला खांद्यावर उचलत तिरंग्यासह कोर्टला फेरी मारून प्रेक्षकांना अभिवादन केले. त्यानंतर निकालाच्या दृष्टीने युकी-स्टॅथम यांच्यातील लढतीला औपचारिकतेचे स्वरूप आले होते. ही लढत युकीने ७-५, ३-६, ६-४ने जिंकून भारताला ४-१ने यश मिळवून दिले. याआधी पहिल्या दिवशी एकेरीच्या लढतीत युकीने टिअर्नीला, तर रामकुमारने स्टॅथमला पराभूत केले होते. पेस आणि विष्णूवर्धन हो जोडी पराभूत झाल्याने पेसचा डेव्हिस चषकात दुहेरीतील सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम हुकला. एकेरीच्या जागतिक क्रमवारीत २७६व्या स्थानी असलेल्या रामकुमारसमोर पहिल्या सेटमध्ये टिअर्नीने आव्हान उभे केले. ५१ मिनिटांपर्यंत ताणला गेलेला हा १२ गेमचा हा सेट जिंकल्यानंतर रिचार्ज झालेल्या रामकुमारने नंतर मागे वळून पाहिलेच नाही. दुसऱ्या सेटमध्ये केवळ एक गेम गमावणाऱ्या या २२ वर्षीय खेळाडूने तिसऱ्या सेटमध्ये तर थकलेल्या टिअर्नीला एकही गेम जिंक न देता बाजी मारली. अमृतराज यांना विजयी निरोपही लढत जिंकून भारतीय संघाने न खेळणारे कर्णधार आनंद अमृतराज यांना विजयी निरोप दिला. अमृतराज यांच्या ३ वर्षांच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळातील ही अखेरची लढत होती. भारतीय संघातील आगामी लढतीसाठी आणखी एक बदल म्हणजे, उझबेकिस्तानविरूद्ध दुहेरीत लिएंडर पेसऐवजी महेश भूपती खेळणार आहे.
भारताकडून न्यूझीलंडचा ४-१ ने धुव्वा
By admin | Updated: February 6, 2017 01:42 IST