पुणे : राज्यातील पुण्यासह दहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी मौनी अमावास्या असल्याने संपूर्ण शहरातून एकही उमेदवारी अर्ज आज (शुक्रवारी) दाखल झाला नाही. एकाही राजकीय पक्षाकडून अद्याप उमेदवारी याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, सर्वच इच्छुक उमेदवारांकडून याद्या जाहीर होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही पहिल्या दिवशी अर्ज दाखल केलेला नाही.महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून शहरातील १४ क्षेत्रीय कार्यालयांमधील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रभागनिहाय ठरवून दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ कमी असल्याने यंदा रविवारीही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. मात्र, १४ निवडणूक कार्यालयांमध्ये मिळून एकही अर्ज दाखल झाला नाही.सर्व निवडणूक कार्यालये सकाळपासूनच सज्ज ठेवण्यात आली होती. प्रत्येक निवडणूक कार्यालयासाठी नेमून दिलेले निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचा संपूर्ण स्टाफ कार्यालयामध्ये उपस्थित होता. उमेदवारी अर्जाबाबतच्या शंका विचारण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे प्रतिनिधी कार्यालयामध्ये आले होते. निवडणूक कार्यालयाच्या बाहेर अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची आहेत, त्याची प्रक्रिया कशी पार पाडायची आहे, याची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून ती क्षेत्रिय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ५ हजार रुपये, तर आरक्षित जागेवरील उमेदवाराला अडीच हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.उमेदवारांनी अर्जासोबत दोन शपथपत्रे सादर करावयाची आहेत. मालमत्तेसंबंधीचे विवरण आणि गुन्हे दाखल असल्यास त्याची माहिती अर्जासोबत जोडून द्यायची आहे. तसेच, सन २००२ नंतर तीनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याचा दाखला उमेदवारी अर्जासोबत जोडावा लागणार आहे. खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून त्याद्वारे खर्चाच्या नोंदी कराव्या लागणार आहेत. एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा करण्याची सवलत यंदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसावर अमावास्येचे सावट
By admin | Updated: January 28, 2017 02:00 IST