पिंपरी : दोन आठवड्यांपूर्वीच आयुक्तपदी रुजू झालेल्या आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासाठी नवीन आलिशान मोटार खरेदी केली जाणार आहे. यापूर्वीची मोटार जुनी झाली असल्याचे कारण देत त्यांच्यासाठी नवीन मोटार खरेदी केली जाणार असून, त्यासाठी ११ लाख ९५ हजार इतका खर्च आहे. लाखो रुपये खर्च करून पर्यटनासाठी जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे दौरे गाजत असतानाच आता आयुक्तांसाठी १२ लाखांची आलिशान मोटार खरेदी केली जाणार आहे. यावरून ‘होऊ दे खर्च’ अशी स्थिती सध्या महापालिकेत दिसून येत आहे. या नवीन मोटारीची खरेदी थेट पद्धतीने केली जाणार असून, खर्चास स्थायी समितीत ऐनवेळच्या विषयाद्वारे मंगळवारी मान्यता दिली. दरम्यान, सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. यासाठी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. यावरून महासभेतही गोंधळ झाला. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी थंड हवेच्या ठिकाणी दौरे काढून हौजमौज करीत असल्याची टीकाही होत आहे. मात्र, पैशांची उधळपट्टी सुरूच आहे. जकात बंद झाल्यानंतर सुरु करण्यात आलेल्या एलबीटीच्या अनुदानात कमी करण्यात आली आहे. खर्च करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच वाढीव खर्चाच्या निविदा मंजूर करणे, एखादा विषय आवश्यकता नसतानाही मंजूर करणे यातून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. यासह आता दौऱ्यांनंतर मोटार खरेदीवरही लाखो रुपये खर्च केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
आयुक्तांसाठी नवी मोटार
By admin | Updated: June 1, 2016 00:46 IST