तळेगाव दाभाडे : सेल्फी काढणे ही मनोविकृती असल्याचा निष्कर्ष युरोपातील तज्ज्ञांनी काढला आहे. सोशल नेटवर्किंगच्या स्वैर वापरामुळे इंटरनेट व्यसनग्रस्तांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, त्यासाठी पुण्यासह देश-परदेशात इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाली आहेत, अशी माहिती राज्यसभा पार्लमेंटरी कमिटीचे सायबर क्राइम कायदेविषयक सल्लागार सदस्य संदीप गदिया यांनी येथे दिली.तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातर्फे इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित सायबर क्राइम कार्यशाळेत गदिया बोलत होते. प्राचार्य डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, पोलीस निरीक्षक वसंत बाबर, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, प्रा. वसंत पवार यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन झाले. डॉ. बाळसराफ यांनी सायबर जगातील विविध घडामोडींची माहिती विद्यार्थ्यांनी करून घेण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक बाबर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, इंटरनेटचा वापर सद्हेतूने होतो का याचा विचार केला पाहिजे. ही सुविधा ज्या मूळ हेतूने मिळाली आहे, त्या ज्ञानार्जनासाठी तिचा वापर करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी प्रा. बी.के. रसाळ, प्रा. डी.पी. काकडे, प्रा. भालेकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान गदिया यांनी केले. (वार्ताहर)
‘इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्राची आवश्यकता’
By admin | Updated: October 12, 2015 01:04 IST