लोणीकंद : समाजात पैशाअभावी शिक्षण अर्धवट सोडल्याची अनेक उदाहरणे सापडतील. शारीरिक अपंग असलेल्याने नशिबाला दोष देणारेही अनेक उदाहरणे आहेत; परंतु घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना व जन्मत: अपंग असलेली काजल रज्जाक सय्यद या विद्यार्थिनीने मोठ्या आत्मविश्वासाने इयत्ता १० वी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरापासून हात नाहीत, गुडघ्याच्या खाली पाय नाहीत, आर्थिक परिस्थिती हलाखीची, तरीही काजलने हार न मानता प्रयत्नांची शर्थ करीत कोपराने पेन धरून मराठीचा पहिला पेपर दिला आहे.४बावधन येथील सय्यद कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी पेरणे गावात आले. बांधकामावर मजुरी करू लागले. काही दिवसांत वडील गेले. भाऊ जावेद, बहीण मुमताज व आई लैला घरकाम करते, सय्यद कुटुंबाला गावकऱ्यांनी ‘इंदिरा आवास योजने’तून घरकुल दिले. पेरणेच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, तर राधाकृष्ण विद्यालयमध्ये तिचे माध्यमिक शिक्षण सुरू झाले. काजल हाताच्या कोपरानेच दप्तर उघडते. वही, पुस्तक काढणे, कंपासपेटीतील सर्व साहित्य काढते, ठेवते, लिहिते. ४अभ्यासातही काजल हुशार आहे. ७० ते ८० टक्के गुण ८ वी ते ९ वीमध्ये मिळवले. दहावी परीक्षा छ. संभाजी हायस्कूल, कोरेगाव भीमा येथे देत आहे. भाऊ जावेद तिची ने-आण करतो. आतापर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. खूप शिकण्याची तिची इच्छा आहे. कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचे स्वप्न आहे. अपंगत्वावर मात करून जिद्दीने परीक्षेला सामोरे जाणाऱ्या काजलला सलाम!