मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे शिबिर पुणे येथे ७ आणि ८ फेब्रुवारीला पुणे येथे होणार असून पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी वाटचाल आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांसंदर्भात यावेळी चर्चा होईल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्र परिषदेत ही माहिती दिली. या शिबिरात राज्यातील प्रमुख पाच हजार नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होतील. शरद पवार प्रामुख्याने उपस्थित असतील. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारने कुठलीही मदत दिली नाही. खासगी सावकारांचे कर्जमाफ करण्याच्या घोषणेचे पुरते हसे झाले आहे. कारण या कर्जमाफीत शेतकरी मोडतच नाहीत, असे वृत्त समोर आले आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयदत्त क्षीरसागर आदी राष्ट्रवादीचे नेते पुढील आठवड्यापासून दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जातील, अशी माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठीची जबाबदारी पक्षाने आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर तर पालघरची जबाबदारी आ.आनंद ठाकूर व आ.निरंजन डावखरे यांच्याकडे सोपविली आहे. दोन्ही निवडणुकीची एकत्रित जबाबदारी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे असेल, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)आघाडीचा निर्णय स्थानिकांवर सोडलाठाणे आणि पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करायची की नाही याचा निर्णय राष्ट्रवादीने स्थानिक नेतृत्वावर सोडला आहे. राज्य पातळीवर या विषयी काँग्रेसशी चर्चा केली जाणार नाही, असे सुनील तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात चिंतन शिबिर
By admin | Updated: January 9, 2015 01:42 IST