पुणे : महाराष्ट्रावर दुष्काळाचे नैसर्गिक संकट आलेले आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. दुष्काळाचे राजकारण करून राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी केले. दुष्काळ पडल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत काहीच केले नसल्याची टीकाही बापट यांनी या वेळी केली.दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती दिली जात आहे. त्या अनुषंगाने शहर भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘यंदा पावसाची परिस्थिती गंभीर आहे. पुण्यात सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला़ मराठवाड्यात हेच प्रमाण १० ते १२ टक्के आहे. दुष्काळ पडल्यास त्यावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असते़ मागील सरकारने त्यावर काहीच केलेले नाही. दुष्काळ निवारणासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ ते ६ हजार कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे. मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या ठिकाणी तातडीने टँकर पुरविण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ठिकठिकाणी चारा छावण्या उघडल्या जात आहेत. शासनाने आतापर्यंत १३ जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. तेथील विद्यार्थ्यांची फी माफ केली जाणार आहे. तेथील लोकांना स्वस्त धान्य पुरविले जाणार आहे. वेळ पडली तर कर्ज काढू पण धान्य व पाण्यावाचून शेतकरी राहू देणार नाही. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिंबक सिंचन पध्दतीचा वापर करून पाण्याची बचत करावी.’’धरणातील पाण्याचा बेकायदा उपसा केला जात असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे, आतापर्यंत १०० ठिकाणी अशी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुष्काळाच्या प्रश्नावर केले जात असलेले आंदोलन फसवे आहे, असे बापट यांनी स्पष्ट केले. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने काहीच केले नाही़, त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली असल्याची टीका शिरोळे यांनी केली.
राष्ट्रवादीने दुष्काळाचे राजकारण करू नये
By admin | Updated: September 14, 2015 04:54 IST