पुणे : महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये पीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यपूर्ण अशा घडामोडी घडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहनेते सुभाष जगताप यांचा पराभव करीत शिवसेनेचे विजय देखमुख आश्चर्यकारकरीत्या निवडून आले. काँग्रेसने शेवटपर्यंत आपली खेळी गोपनीय ठेवत शेवटच्या क्षणी शिवसेनेचे विजय देशमुख यांच्या बाजूने मतदान केल्याने ते ८ मतांनी विजयी झाले. यामुळे भाजपा, शिवसेना व काँग्रेस यांचा उलटा पुणे पॅटर्न सभागृहात पाहायला मिळाला.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महापालिकेमध्ये आघाडी होताना चौथ्या वर्षाचे स्थायी समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचे मान्य केले होते, मात्र नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा शब्द पाळला नाही, उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अश्विनी कदम यांना निवडून आणले. त्यामुळे पीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांची मुदत येत्या ३१ तारखेला संपत आहे, त्यामुळे या पदावर विद्यमान सभागृहनेते सुभाष जगताप यांची निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव आरपीआयचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी मांडला. त्यानंतर कॉंग्रेसने संजय बालगुडे, भाजपाने माधुरी सहस्रबुध्दे, शिवसेनेने विजय देशमुख, तर मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. सुभाष जगताप यांचे नाव पुकारताच त्यांना ५६ मते पडली, त्यानंतर मनसेचे किशोर शिंदे यांचे नाव पुकारले गेले त्यांना २३ मते पडली. काँग्रेस व भाजपाने त्यांचे पत्ते उघड करीत त्यांच्या पक्षाच्या सदस्यांची उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला अन् सभागृहातील वातावरणच बदलले. विजय देशमुख यांचे नाव पुकारताच त्यांना ६२ मते पडली. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीला गाफील ठेवण्याची खेळी यशस्वीकाँग्रेसने शिवसेना-भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे सभागृहात मतदानाच्या पूर्वी जाहीर केले असते तर राष्ट्रवादीकडून मनसेची मदत घेण्यात आली असती. त्यामुळे त्यांनी त्यांची चाल पूर्णत: गोपनीय ठेवली. मनसेसह शिवसेना व भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जगतापांचा विजय होणार असे चित्र तयार झाले. राष्ट्रवादी व मनसेच्या सदस्यांची मते देऊन झाल्यानंतर काँग्रेस व भाजपाने त्यांचे पत्ते उघड करीत सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीला गाफील ठेवण्याची खेळी यशस्वी झाली.राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समिती अध्यक्षपद, पीएमपी संचालकपदाबाबत काँग्रेसला दिलेला शब्द पाळला नाही. मनसे सोबत आल्यामुळे आमच्या पक्षाची चर्चा करणे त्यांनी बंद केले होते. या कृतीतून येणाऱ्या काळात आम्हाला गृहित धरू नये एवढेच आम्हाला सांगायचे आहे. आम्ही शब्द पाळले, मात्र त्यांनी शब्द न पाळल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.- अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेता४पीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सभागृह नेते सुभाष जगताप यांचा पराभव केल्याने महापालिकेतील आगामी दोन वर्षांतील समीकरणे बदलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात झालेल्या अलिखित करारानुसार पाचही वर्षांचे महापौरपद, शिक्षण मंडळ अध्यक्षपद, पहिल्या तीन वर्षांचे आणि पाचव्या वर्षांचे स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते. तर, कॉंग्रेसला पाच वर्षे उपमहापौरपद, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्षपद आणि चौथ्या वर्षाचे स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि एक वर्ष पीएमपीचे संचालकपद देण्याचे ठरले होते.
पीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का
By admin | Updated: March 19, 2015 00:21 IST