इंदापूर : तालुक्याच्या दक्षिण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य व शरद पवार, अजित पवार यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब करगळ यांनी शुक्रवारी (दि.१४) काँग्रेस पक्षप्रणीत कर्मयोगी शंकरराव पाटील शेतकरी विकास पॅनलतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. करगळ हे १९८९पासून ते शरद पवार व अजित पवारांबरोबर आहेत. या नव्या घडामोडीबाबत ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की माजी खासदार कै. शंकरराव पाटील व माजी आमदार गणपतराव पाटील यांनी उत्तम चाललेल्या सहकारी संस्थांमध्ये राजकारण येऊ नये म्हणून या संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा पायंडा पूर्वीपासून पाडलेला आहे. मागील काळात काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी तालुका खरेदी विक्री संघ, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना या सर्व ठिकाणी बिनविरोध संचालक निवडले. मग कृषी उत्पन्न बाजार समितीचीच निवडणूक बिनविरोध का करायची नाही, याचे समाधानकारक उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून मिळाले नाही, म्हणून आपण आपली उमेदवारी दाखल केली आहे, शरद पवार व अजित पवार यांच्यावर माझी अढळ निष्ठा आहे. ती कायम रहाणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही; सोडणार नाही. त्यांनी मला पक्षातून काढून टाकावे, असे करगळ म्हणाले.
करगळ यांचा राष्ट्रवादीला धक्का
By admin | Updated: October 15, 2016 06:05 IST