दौंड : नानवीज (ता. दौंड) येथे पैशाच्या वादातून देवानंद पवार (वय २४, रा. गोपाळवाडी, ता. दौंड) या युवकाचा खून झाल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली. रविवारी (दि. १३) दुपारी चारच्या सुमारास देवानंद पवार हा घरातून वायरलेस फाटा येथे जात असल्याचे सांगून बाहेर पडला. त्यानंतर दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेपाचदरम्यान त्याच्यावर नानवीज हद्दीतील नानवीज-सोनवडी रस्त्याजवळील गणपती मंदिराजवळ धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. त्याच्या काही नातेवाइकांनी त्याला उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून दौंड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले; परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. देवानंद पवार याची आई हेमा पवार यांनी दौंड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, पैशाच्या वादातून डाल्या त्रिमुख्या भोसले, मिथुन डाल्या भोसले, चाप्या डाल्या भोसले, अलका डाल्या भोसले, राम्या बच्या भोसले, मंगल बच्या भोसले, तंब्या मिलम्या पवार, झिरकोट तंब्या पवार आणि प्रेमा शिकलगऱ्या पवार (सर्व रा. नानवीज, ता. दौंड) यांच्याविरुद्ध खून केल्याची फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार ९ संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयात मृताच्या नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. आरोपींना शोधण्यासाठी शोध पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली. (वाार्ताहर)
नानवीजला पैशाच्या वादातून युवकाचा खून
By admin | Updated: November 16, 2016 02:53 IST