बलभीम भोसले, पिंपळे गुरव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवख्या पाहुण्यांना परिसराची माहिती मिळावी, म्हणून गल्लीच्या सुरुवातीला मोठ्या अक्षरामध्ये गावाच्या नावाचे फलक लावले आहेत. मात्र, खासगी व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे फलक दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे नवख्या पाहुण्यांची मोठी तारांबळ होत आहे. त्याकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नावाचे फलक अडगळीत अडकले आहेत. बेस्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहरामध्ये महापालिकेच्या वतीने प्रशस्त रस्त्यांचे नियोजन केले. तसेच, रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ नये, म्हणून पार्किंगची सोय करण्यात आली. मात्र, जागेला सोन्याचे भाव असल्याने रहिवाशांनी पार्किंग न करता जागेचा बांधकामासाठी पुरेपूर फायदा घेतला. त्यामुळे रुंद रस्ते करूनही रस्ते अरुंद बनले आहेत. गल्लीमध्ये रस्त्यावर खासगी वाहनांची गर्दी वाढली आहे. या वाढलेल्या गर्दीमुळे खासगी व्यावसायिकांनी आपल्या ब्यूटीपार्लर, डॉक्टर, क्लास, फॅशन आदींच्या फलकांची ऐन मोक्याच्या जागी गर्दी होत आहे. बाहेरगावहून आलेल्या नवख्या पाहुण्यांना परिसरात येऊनसुद्धा पुन्हा नागरिकांना हा कोणता परिसर आहे, हा भाग कोठे आहे, असे अनेक प्रश्न विचारावे लागतात. नवी सांगवी, सांगवी, दापोडी, सुदर्शननगर आदी भागांमध्ये गावाच्या नावाचे फलक अडगळीत अडकले आहेत. मुख्य चौकामध्ये मोक्याच्या ठिकाणी खासगी व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे फलक लावले आहेत. नवखा पाहुणा चौकामध्ये आल्यानंतर पाहुण्याला ठळक गल्लीच्या किंवा गावाच्या नावाचा फलक दिसणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी फलकांवर अतिक्रमण झाले आहे. अशा ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने माहिती घेऊन खासगी व्यावसायिकांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसेच, त्या फलकांवर दिशादर्शक बाण दाखविणे गरजेचे आहे. म्हणजे नवख्यांना अडचण निर्माण होणार नाही. - राजेंद्र जगताप, नगरसेवकगल्लीचे फलक ठळक दिसत नसल्याने परगावहून आलेल्या नवख्या पाहुण्यांची अडचण निर्माण झाली आहे. अनेक खासगी व्यावसायिक आपले स्वत:च्या व्यवसायाचे फलक लावून स्वत:चा स्वार्थ साधत आहेत. नवख्या पाहुणे निरक्षर असल्यामुळे चौकामध्ये रिकामटगे बसलेल्या तरुणांना परिसराची माहिती विचारतात. जवळच परिसर असला, तरी त्यांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्या रिक्षाच्या प्रवासामध्ये पाहुण्यांना दामदुप्पट पैसे मोजावे लागतात. त्यामुळे संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष घालण्याची गरज आहे.- योगेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे गुरव ज्या ठिकाणी फलक झाकलेले आहेत, त्या ठिकाणची पाहणी करून आमच्या प्रभागांतर्गत अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाईल. त्यांना लेखी पत्र दिले जाईल. अनेक वेळा फलक काढूनही पुन्हा मागचे पाढे या म्हणीप्रमाणे खासगी व्यावसायिक आपले फलक लावतात. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. यापुढे असे फलक आढळल्यास त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, दुकानदारांनी व खासगी व्यावसायिकांनी आपले फलक आपल्या दुकानासमोरच लावावेत. इतर चौकांमध्ये लावू नयेत. - रामकिसन लटपटे, प्रशासन अधिकारी क प्रभाग
गावाचं नाव लपलं अडगळीत!
By admin | Updated: October 13, 2015 01:01 IST