पुणे : कुख्यात गुंड बंट्या पवार याच्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने २ बेकायदा पिस्तूलांसह अटक केली. त्याच्याकडून सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी गुरुवारी दिली. मंगेश अरविंद खरे (वय २७, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे शैलेश जगताप यांना खबऱ्याने खरे याच्या बाबतची माहिती दिली. खरे याच्याकडे बेकायदा शस्त्रे असून तो शिवाजी रस्त्यावरील राष्ट्रभूषण चौकामध्ये येणार असल्याची माहिती मिळताच सापळा लावण्यात आला. उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, शैलेश जगताप, संतोष पागार, परवेझ जमादार आदींच्या पथकाने सापळा लावून त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा, देशी बनावटीचे एक पिस्तूल, सहा काडतुसे असा एकूण ५१ हजार २०० रुपयांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
कुख्यात बंट्याच्या भावाचा खुनी गजाआड
By admin | Updated: February 17, 2017 05:09 IST