राजगुरनगर: येथील नगर परिषदेने खेड पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या कचरा डेपोत जागा नसल्याने डेपोतील कचरा रस्त्यावर येऊ लागल आहे. या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक तसेच वाहनचालक हैराण झाले असून कोरोनाकाळातच आरोग्यचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगर परिषद प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून पोलीस ठाण्यामागील रस्ता घाणीच्या साम्राज्यात अडकल्याचे चित्र आहे.
भीमा नदीकाठी खेड पोलीस ठाण्याच्या पाठीमागे राजगुरुनगर शहरातील कचरा उचलून घंटागाडीद्वारे येथे आणण्यात येतो, मात्र येथे अगोदरच कचऱ्याचे ढिगारे पडले असल्यामुळे हा कचरा रस्त्यावरच टाकला जातो. त्यामुळे राजगुरुनगर शहरात पोलीस ठाण्याच्या पाठीमागील रस्त्यावरून ये - जा करताना नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याठिकाणी मोकाट कुत्री व डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी याठिकाणी सुटली आहे. या कचरा डेपो शेजारीच खेड पोलीस ठाण्याची चौकी आहे याठिकाणी अनेक नागरिक कामानिमित्त रोज येत असतात. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांचे व पोलिसांचे या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण राजगुरुनगर शहरात आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने या कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सर्वांनीच पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे. या दुर्गंधीमुळे याठिकाणी मच्छर व डासांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे डेंग्यू व इतर रुग्णही शहरात आढळून येत आहे. या दुर्गंधीमुळे रोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत नगर परिषद प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
०८ राजगुरुनगर कचरा
कचरा डेपोत कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने डेपोच्या बाहेरच कचरा टाकला जात आहे.