पुणे : नदीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून,ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणारा मुंढवा जॅकवेल प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाची जलवाहिनी आपल्या जागेतून जात असल्याने, या कामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेलेल्या याचिकाकर्ता शेतकऱ्याच्या मागणीनुसार, या कामास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट नकार दिला. तसेच, या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत मागणाऱ्या या शेतकऱ्याची मागणी फेटाळून ही याचिकाच निकाली काढली. शहरात निर्माण होणारे सांडपाणी शुद्ध करून, ते मुठा नदीत सोडले जाते. हे पाणी मुंढवा येथे बंधारा घालून अडविण्यात आले असून, ते जॅकवेलद्वारे साडेसतरानळी येथून जिल्ह्यातील सिंचनासाठी सोडले जाणार आहे. त्यासाठी मुंढवा बंधाऱ्यापासून बेबी कॅनॉलपर्यंत तब्बल तीन किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या जलवाहिनेचे काम अंतिम टप्प्यात असतानाच, स्थानिक शेतकरी संदीप तुपे यांनी आपल्या जागेतून ही जलवाहिनी टाकण्यास विरोध केला; तसेच महापालिकेविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागितली. तेथे पालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत मागितली जात होती. त्यानंतर हा दावा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला होता. त्यावर आज सुनावणी झाली. न्या. एम. एस. सोनक यांनी शेतकऱ्याची मागणी फेटाळून लावताना, हा सार्वजनिक हिताचा प्रकल्प असल्याचे सांगत स्थगिती देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणे महापालिकेला लवकरच हा प्रकल्प पूर्ण करता येईल. त्यामुळे वीस हजार एकशे अठरा हेक्टर शेतजमीन ओलीता खाली येणार आहे; तसेच पुणेकरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळण्यास मदत होईल.- गिरीश बापट, पालकमंत्री
मुंढवा जॅकवेल मार्गी लागणार
By admin | Updated: June 18, 2015 00:14 IST