अमोल अवचिते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने १० मार्चला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले. त्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला. जर सरकारने निर्णय दिला तर आयाेगाची शंभर टक्के परीक्षा घेण्याची तयारी आहे, असे आयोगातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला नाही. राज्य सरकारने दिलेल्या आदेशामुळेच आतापर्यंतच्या मुदतवाढ दिलेल्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. एमपीएससीची कधीही परीक्षा घेण्याची तयारी आहे. १४ मार्चची पूर्व परीक्षादेखील जर सरकारने निर्णय दिला तर घेता येईल. केवळ एका आदेशाची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्याची एमपीएसीसीने तयारी दाखवलीच आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आवश्यक प्रतिबंधक उपाययोजनांची व्यवस्थादेखील केली. मात्र, सरकारने दिलेल्या आदेशामुळे परीक्षा स्थगित केली आहे. पहिल्या लॉकडाउनच्या दरम्यान ५ एप्रिल २०२० ला होणारी परीक्षा नाईलाजास्तव रद्द करण्याची वेळ आली होती. एमपीएसीसीची शंभर टक्के तयारी आहे. सरकारने याआधी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएसीसीला अंधारात ठेवून घेतला होता. परीक्षा रद्द करून एमपीएससीचेच आर्थिक नुकसान होत आहे. एक परीक्षा रद्द केली तर सुमारे २ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. इतर खर्च वेगळाच येतो, असे एमपीएससीच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.