पुणे : राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सरकार गोंधळलेले असल्याने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची वाट लागली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. ११) केला. राज्य सरकारने तातडीने विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना थेट मदत केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
पाटील म्हणाले की, एमपीएससीची परीक्षा कोरोनामुळे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पुढे ढकलली हे राज्य सरकारने स्पष्ट केले पाहिजे. कोरोनाच्या स्थितीतही आरोग्य विभागाच्या भरतीच्या परीक्षा झाल्या तर एमपीएससीच्या बाबतीत काय समस्या आहे, हे स्पष्ट केले पाहिजे. अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे वषार्नुवर्षे तयारी करणाऱ्या सामान्य कुटुंबातील असंख्य विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. परीक्षा लांबल्याने अनेकांची वयोमर्यादा ओलांडण्याची भीती आहे. सरकारला आता कोरोनाच्या कारणामुळे लगेच परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी एमपीएससीची वयोमर्यादा वाढवली पाहिजे. तसेच परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी जो जास्तीचा खर्च येईल त्यासाठी मदत केली पाहिजे.
----------------------------------------