पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे यांच्या पुढाकाराने सदरचे आंदोलन सुरू झाले आहे. मेरगळवाडी येथील स. नं. ३९२ मधील वाटपक्षेत्रातील सातबारा उतारा पाहता १९६० ते ६५ या कालावधीत मागासवर्गीय समाजातील लोकांना जमीनवाटप झाली होती. ज्या लोकांना क्षेत्र वाटप झाले आहे, अशा लोकांना दौंड येथील तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र, त्यांच्या नोंदी पूर्ववत होण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, न्यायासाठी संबंधितांना पुणे आणि पुरंदर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तसेच वाटप भोगादारांच्या जमिनीचा निर्णय घेताना महसूल आणि वन विभाग यांच्यात समन्वय नसल्याने सदरच्या जमिनीचे निर्वाणीकरण झाले नसल्याने याबाबत निर्णय घेणे कठीण होत चालले आहे. तेव्हा हा विषय अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने एक प्रकारे हा मागासवर्गीय समाजावर आन्याय असल्याचे तहसीलदार संजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी म्हटले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित सोनवणे, राजू जाधव, यादव जाधव, मनोहर सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, संजय गायकवाड , सचिन खरात यांनी धरणे आंदोलने सुरु केले आहे.
दौंड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सुरु करण्यात आलेले धरणे आंदोलन.