पिंपरी : एलबीटी कराविषयीचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून व्यापार्यांच्या दबावाखाली महाराष्ट्रातील महानगरपालिकांची एलबीटी कायमस्वरुपी काढून टाकण्याचा निर्णय २ जूनला होणार्या विधानसभा अधिवेशनात होणार असून एलबीटी रद्द केल्यास बेमुदत आंदोलन करू, राज्य सरकारविरोधात लढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महानगरपालिका आणि नगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शरद राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृहात फेडरेशनची बैठक झाली. राज्यातील २७ महापालिकांच्या कामगार संघटनांनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सर्वांनी आपापले झेंडे व मतभेद विसरून राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या वेळी पिंपरीचे शशिकांत झिंजुर्डे, नवी मुंबईचे सुरेश ठाकूर, कल्याण डोंबिवलीचे नवनाथ महारनवर, औरंगबादचे गौतम खरात, सोलापूरचे अशोक जानराव, पुणेचे बापू पवार, प्रकाश जाधव, मधुकर नरसिंगे, सांगलीचे दिलीप शिंदे, ठाणेचे रवी राव, बेस्ट वर्कर्स युनियनचे रंगनाथ सातवसे, पीएमपीएमएलचे संजय कुटे आदी उपस्थित होते. राव म्हणाले, ‘‘केवळ राजकीय व मतांचा विचार करून किंवा व्यापार्यांच्या दबावाखाली येऊन सरकारने अशा रितीने हा विषय हाताळणे म्हणजे भारतीय घटनेची पायमल्ली असून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्यासारखे आहे. एलबीटी रद्द केल्यास रक्कम रुपये १६ हजार कोटी एवढी रक्कम राज्य सरकारला कशी उभी करता येईल. या संदर्भात संघटनांशी चर्चा न करता निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ जून पासून सर्व महापालिकातील कर्मचारी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करणार आहोत. फेडरेशनबरोबर चर्चा न करता व मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची निर्णयाची वाट न पाहता एलबीटी रद्दचा प्रयत्न झाल्यास ८ जून मध्यरात्रीपासून पालिकातील कामगार कर्मचारी ‘बेमुदत आंदोलन’ करणार आहेत.’’(प्रतिनिधी)
एलबीटी रद्द केल्यास आंदोलन
By admin | Updated: June 2, 2014 01:41 IST