पुणे : कोणतीही मोटारगाडी बनवताना प्रथम त्याचे प्रारूप आणि विविध तपासण्यांवर भर दिला जातो. एखाद्या गाडीच्या अंतिम बनावटीसाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागतो. शंभराच्या आसपास प्रारूपे बनवून त्याच्या विविध तपासण्या केल्या जातात. कोट्यवधी रुपये खर्च होतात. या सगळ्यात उत्तीर्ण झाल्यानंतरची त्या प्रारूपाचे उत्पादन करण्यात रूपांतर होते, असे मत टाटा मोटर्सच्या संशोधन व विकास विभागाचे माजी सहायक सरव्यवस्थापक श्रीनिवास शारंगपाणी यांनी व्यक्त केले. मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोटारगाडीचा विकास’ (डेव्हलपमेंट आॅफ आॅटोमोबाइल्स) या विषयावर इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात शारंगपाणी बोलत होते. याप्रसंगी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. यशवंत घारपुरे, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअर्सचे चेअरमन डॉ. गिरीश मुंदडा आदी उपस्थित होते.शारंगपाणी म्हणाले, ‘ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेऊन मोटारींमध्ये आधुनिकता आणली जाते. मालवाहू, प्रवासी गाड्या बनवताना विविध प्रकारचे रस्ते, हवामान, अपघातप्रवण परिस्थितीमध्ये तपासण्या घेतल्या जातात. संकल्पना ते उत्पादन अशी ही प्रक्रिया असते. त्यात सातत्याने बदलही होत असतात. भारतातील आॅटोमोबाइल कंपन्या आता संशोधनावरही भर देत आहेत. त्यामुळे परदेशी बनावटीच्या वाहनांपेक्षा आपल्या स्वदेशी बनावटीची वाहने अधिक चांगली व सक्षम होत आहेत.’ डॉ. गिरीश मुंदडा यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
मोटारीच्या विकासात प्रारूपे महत्त्वाची
By admin | Updated: March 23, 2017 04:38 IST