नारायणगाव : जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर एवढा वाढला आहे, की ते आता दिवसाढवळ्या रस्त्यावर फिरत आहेत. मंगळवारी सकाळी येथील हिवरे गावाजवळ आई व मुलगा दुचाकीवरून जात असताना अचानक समोर आला. त्याने दुचाकीला पंजा मारल्याने ताबा सुटून ते दोघे खाली पडले. सुदैवाने बिबट्या पळाला म्हणून दोघे बचावले.ही घटना मंगळवारी (दि. १) सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली, अशी माहिती जुन्नर विभागाच्या वनपाल मनीषा काळे यांनी दिली. सुरेखा अंकुश कवडे व त्यांचा मुलगा प्रसाद अंकुश कवडे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडविण्यात आले आहे. सुरेखा व प्रसाद कवडे हे ओझरवरून येेंदे हिवरे या ठिकाणी नातेवाईकांकडे चालले होते. याच वेळी बिबट्या हा रस्ता क्रॉस करत असताना कवडे यांची दुचाकी बिबट्याच्या समोर येऊन थांबली. बिबट्याने घाबरून दुचाकीला पंजा मारला. या वेळी प्रसाद हा घाबरून गेल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व दोघेही दुचाकीवरून खाली पडले. दोघांनाही खरचटले असून, काही ठिकाणी मुका मार लागला आहे. वनविभागातर्फे वनपाल मनीषा काळे यांनी घटनास्थळी तसेच कवडे कुटुंबीयांना भेट देऊन माहिती घेतली.
बिबट्याच्या हल्ल्यातून आई व मुलगा बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 06:18 IST