--
घोटवडे : घोटवडे, रिहे, मुगावडे या गावांना जोडलेला डोंगर भाग परिसरातील शेतजमिनीवर मोकाट जनावरांनी धुडघूस घातला आहे. त्यामुळे शेतकरी घाबरला आहे. मात्र वनक्षेत्रातून येणाऱ्या या जनवारांची तक्रार वनखात्याकडे केली, तर ते महसूल व पोलिसांकडे बोट दाखवता व महसूल-पोलीस खात्याकडे तक्रार केली तर ते वनखात्याकडे बोट दाखवितात त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यावर शेकडो एकर वनखात्याची जमीन, तर शेकडो एकर शेतकऱ्यांची जमीन असून भरपूर पाऊस-मातीची जमीन व न होणारी जंगलतोड यामुळे भरपूर झाडी व गवत वाढते. गेली ७ ते ८ वर्षे त्या जंगलात चरावयास गेलेली काही जनावरे तेथेच वस्ती करून रााहिली. त्यानंतर त्यांच्यातून प्रजनन होऊन तब्बल ३५ ते ४० मोकाट जनावरांचा कळप तयार झाला. त्यात धष्टपुष्ट गाई, बैल, वासरे तयार झाली व ती मानव वस्तीपासून दूर राहिल्यामुळे रानटी झाली. जनावरे माणसांना मारू लागली व शेतकरी घाबरू लागले मोकाट जनावरे जुलै ते ऑक्टोबर पावसाळ्यात डोंगरात राहतात कारण भरपूर हिरवा चारा मुबलक पाणी मिळते परंतु नोव्हेंबर ते जून डोंगरातील चारापाणी कमी होते व ती जनावरे चारा पाण्याच्या शोधत गावातील बागायत जमिनीमधील पिकावर ताव मारतात. विशेषत: ही जनावरे दिवसा जंगलात राहतात व रात्री शेतात नुकसान करतात त्यामुळे त्यांना हुसकावून लावताना अनेक अडचणी येतात.
मोकाट जनावरे असल्यामुळे वनखाते लक्ष देत नाही, महसूल खाते किंवा पोलीस प्रशासन तक्रार करायची कुठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कोण वाली या संकटाला व कोण सोडविल हा प्रश्न, या विवंचनेत ३ गावांचे शेतकरी आहेत.
--
तीन गावांत शेकडो एकर पिकांची नासाडी
शेतातील गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, कांदे-भाजीपाला पिकाची एक रात्रीत ३ एकरांपर्यंत नासाडी करतात. गेल्या चार-पाच वर्षांत या मोकाट जनावरांनी शेकडो एकर पिकांचे नुकसान केले आहे. त्याची झळ शेतकरी सहन करीत आहेत. डोंगराळ व वन्यक्षेत्र असल्यामुळे या परिसरात कामगार मिळत नाहीत, खते व बियाणांचे भाव शेतीमालाला हमी भाव नाही अशा परिस्थितीत मोकाट जनावराचा त्रासामुळे तीन गावचे शेतकरी हैराण झाले आहेत.
--