\Sतासभराचा दौरा : लसीनिर्मिती, वितरण तयारीचा घेणार आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी (दि. २८) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येत आहेत. ‘सीरम’मध्ये सुमारे तासभर थांबून कोरोनावरील लस उत्पादनाची माहिती घेणार आहेत.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत संशोधित होणाऱ्या कोरोनावरील लसीच्या उत्पादनाचे हक्क पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ने मिळवले आहेत. ऑक्सफर्डच्या लसीच्या प्राथमिक चाचण्या समाधानकारक आल्या आहेत. त्यामुळे लस उत्पादनाची जगातली सर्वात मोठी क्षमता असल्याने ‘सीरम’कडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीरम’मधील लस उत्पादन आणि वितरण व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून पुण्यात चालू होती. त्यावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले.
सीरमला भेट देण्यासाठी ९८ देशांमधले राजदूत येत्या ४ डिसेंबरला येत आहेत. ही सर्व मंडळी पुण्यातील जिनोव्हा बायो-फार्मासिटिकल्स कंपनीलाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी मोदी स्वत: पुण्यात येऊन आढावा घेणार आहेत. याबाबत राव यांनी सांगितले, “पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौऱ्यासंदर्भात गुरुवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत पत्र आले. परंतु त्यापूर्वीच या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू केली होती. दिल्लीतील केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान गुरुवारी दाखल झाले आहेत.”
-------
पंतप्रधानांचा शनिवारचा दौरा
दुपारी १२.३० - लोहगाव विमानतळावर आगमन. तिथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूटला रवाना होणार.
दुपारी १ ते २ - लस उत्पादनाचा आढावा
दुपारी २ - हेलिकॉप्टरने ‘सीरम’मधून लोहगाव विमानतळावर आगमन व त्यानंतर हैदराबादकडे रवाना.