येरवडा : येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने वडाच्या झाडाच्या बुंध्यात लपवून ठेवलेला मोबाईल कारागृह दक्षता पथकाच्या अधिकाऱ्याने हस्तगत केला. याप्रकरणी खुल्या कारागृहाचे तुरुंग अधिकारी एकनाथ शिंंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जन्मठेपेची शिक्षा भोगत असणारा खुल्या कारागृहातील कैदी याकूब मुमताज खान (वय ४२) याने हा मोबाईल या ठिकाणी लपविला असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा खुल्या कारागृहात गुरुवारी (दि. १९) कारागृह विभागाच्या दक्षता विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी खुल्या कारागृहात जन्मठेपेसह इतर महत्त्वाच्या गुन्ह्यातील शिक्षाधीन बंदींना ठेवण्यात येते. या तपासणीदरम्यान इस्त्री विभागाच्या मागील बाजूस असणाऱ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यात पालापाचोळ्याखाली एक मोबाईल हॅन्डसेट मिळून आला. त्यासोबत एक चार्जर व दोन सिमकार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कारागृह विभागाच्या नियमावलीनुसार मोबाईल तसेच इतर अनावश्यक वस्तूंचा विनापरवाना वापर केल्याचे या वेळी उघड झाले. या मोबाईलचा वापर शिक्षाधीन बंदी याकूब खान करीत असल्याचे निष्पन्न झाले. याकूब हा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी असून, तो सध्या इस्त्री विभागात काम करतो. याकूब हा मोबाईल केव्हापासून वापरत होता, त्या मोबाईलवरून त्याने कोणाशी संपर्क केला तसेच त्याचा वापर आणखी कशासाठी झाला याचा तपास करणे आवश्यक असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. कारागृहाच्या आवारात मोबाईलसारख्या वस्तू सापडत असतील तर त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.