पुणे : शिक्षण मंडळाच्या एलसीडी वाटपामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचे उजेडात आले असून, अनेक शाळांमध्ये एलसीडी पोहोचलेच नसल्याचे एका संघटनेने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. शिक्षण मंडळाने २०१२ मध्ये विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण देण्यासाठी ६६ हजार रुपये किमतीचे ५९९ एलसीडी खरेदी केले, त्यानंतर २०१४ मध्ये ४० हजार रुपये किमतीचे २५० एलसीडींची खरेदी करण्यात आली. त्यापैकी संभाजी संघर्ष समितीने आतापर्यंत केलेल्या पाहणीमध्ये १४ एलसीडी शाळांमध्ये पोहोचले नसल्याचे आढळून आले आहे. सोमवार पेठेतील के. सी. ठाकरे या शाळेत शिक्षण मंडळाकडील कागदोपत्रानुसार २ संच देण्यात आले आहेत, प्रत्यक्षात एक संचच त्याठिकाणी पोहोचला आहे. शिवाजीनगरच्या लालबहादूर शाळेत ३ पैकी २ संच पोहोचले आहेत. विश्रांतवाडीच्या विठठ्लराव गाडगीळ शाळेत १३ पैकी ८ संच पोहोचले आहेत. येरवडा जेल वसाहतीमधील भाऊसाहेब जाधव विद्यालयामध्ये ७ संच मिळाल्याची नोंद असून प्रत्यक्षात तिथे ६ संच आढळून आले. संघर्ष समितीने शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून प्रकार उजेडात आणला आहे. संघर्ष समितीचे सुभाष जाधव, सुप्रिया कांबळे, राजश्री शिंदे, सरिता काळे, संगीता काकडे, लिला पात्रे यांनी या पाहणीमध्ये सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या एलसीडी वाटपामध्ये गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 03:18 IST