पुणे : सोहिल वैद्य यांच्या ‘अ शॉर्ट फिल्म अबाऊट वेटिंग’ या लघुपटाची चीन येथील सेकंड एशिया इंटरनॅशनल यूथ शॉर्ट फिल्म एक्झिबिशन वेन्झ्हौ या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड झाली. त्यामुळे लघुपटाच्या विश्वात पुन्हा एकदा पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले.लघुपटामध्ये मित्राची वाट पाहणाऱ्या तरुणीच्या मानसिक अवस्थेचे आणि उलाघालीचे बोलके चित्रण करण्यात आले आहे. सध्याच्या उपभोगवादी जगात स्त्रियांना ज्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागते, त्या भावना उत्कटपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूळचे पुण्याचे असलेले सोहिल वैद्य सध्या अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील यूएससी स्कूल आॅफ सिनेमॅटिक आर्ट्स या संस्थेमध्ये चित्रपट निर्मिती व दिग्दर्शनाचे शिक्षण घेत आहेत. या संस्थेमध्ये अभावाने प्रवेश मिळालेल्या भारतीयांपैकी ते पहिलेच पुणेकर आहेत. सोहिल वैद्य यांचा शहरात फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांवर आधारित ‘डायरीज् आॅफ अननोन’ हा माहितीपटही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजला आहे. यापुढेही लघुपटाच्या माध्यमातून समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुणेकराच्या लघुपटाला आंतरराष्ट्रीय झळाळी
By admin | Updated: November 16, 2016 02:16 IST