पुणे : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा निषेध, सुरक्षारक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी परिधान केलेला त्यांचा गणवेश व नोटाबंदीच्या निषेधासाठी शिवसेना नगरसेवकांनी घातलेल्या काळ्या टोप्या, असे सर्व विषय झळकले. मात्र त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने सभाच तहकूब केली.ही सभा आता शुक्रवारी (दि. १०) दुपारी ३ वाजता होणार आहे. सभेचे कामकाज सुरू होताच मनसेच्या वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी सुरक्षारक्षकांच्या गणवेशात प्रवेश केला. महापालिकेत १ हजार ८०० सुरक्षारक्षक कंत्राटी पद्धतीने कितीतरी वर्षे कार्यरत होते. प्रशासनाने अचानक ९०० सुरक्षारक्षकांची कपात केली, त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. यावर चर्चा व्हावी अशी मागणी मोरे यांनी केली. त्याच वेळी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, पल्लवी जावळे तसेच अन्य नगरसेवक काळी टोपी परिधान करून सभागृहात आले. नोटाबंदी निर्णयाचा त्रास गेले वर्षभर जनता सहन करत आहे. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करीत आहोत, असे संजय भोसले यांनी सांगितले.माजी नगरसेवक सतीश लोंढे यांचे निधन झाल्यामुळे सत्ताधारी भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व अन्य पदाधिकारी सभा तहकूब करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे या आंदोलनाकडे महापौर मुक्ता टिळक, भिमाले तसेच अन्य पदाधिकाºयांनी दुर्लक्षच केले. दरम्यान, त्यांचा सभा तहकुबीचा मनोदय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नंदा लोणकर यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मद्याच्या उत्पादनाला महिलांच्या नावाच्या वक्तव्याचा निषेध करून सभा तहकूब करावी, अशी तहकुबी सूचना दिली. ही सभा आता शुक्रवारी ३ वाजता होईल.
मंत्र्यांचा निषेध, सुरक्षारक्षकांचा गणवेश व नोटाबंदीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:23 IST