पिंपरी : सिंधी बांधवांच्या चालिहो उत्सवाची सांगता झाली. त्यानिमित्त पिंपरीत पवनेच्या काठावर रविवारी पूजन केले. त्या वेळी भाविकांनी गर्दी केली होती. चालिहो उत्सवानिमित्त सिंधी बांधवांनी 'बेटी बचाओ'चा संदेश दिला.चालिहो हा उत्सव सिंधी बांधव चाळीस दिवस साजरा करतात. या चाळीस दिवसांत उपवास केले जातात. दरम्यान, रविवारी या उत्सवानिमित्त पिंपरीतील मुख्य बाजारापासून नदीकाठावरील झुलेलाल मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली, अशी माहिती मंदिराचे सचिव जवाहर कोटवानी यांनी दिली. त्यात सिंधी बांधव सहभागी झाले होते. बाबा छतुराम यांच्या पालखीची मुख्य बाजारपेठेतील मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी सर्वांत पुढे बाबा झुलेलाल मंदिरात प्रज्विलत करण्यात आलेली ज्योत होती. भाविक या ज्योतीचे दर्शन घेत होते. ही मिरवणूक संपूर्ण पिंपरी परिसरात फिरून नदीकाठावरील बाबा छतुराम मंदिराजवळ पोहोचली. यानंतर मिरवणुकीचे विसर्जन होऊन महिलांनी नदीपात्नात दिवे सोडले. बाबा झुलेलाल मंदिरात शांती, समृद्धीसाठी पल्लव करण्यात आले. या वेळी भाविकांना प्रसादाचे वाटप केले. या वेळी कुमार धनवानी, अमित तेजवानी, भरत चंद्राणी, प्रिया साहित्या, कीर्ती धनवानी यांनी प्रसादाचे वाटप केले. उत्सवाचे आयोजन बाबा छतुराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गुरु मुख सुखवानी, मास्तर बल्लू मल, भगवान लालवाणी, राजन ताराचंद, प्रताप बजाज, कुमार भाई यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)
चालिहो महोत्सवातून 'बेटी बचाओ'चा संदेश
By admin | Updated: August 25, 2014 05:29 IST