पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनची मेडिकलमधून होणारी विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयानेच आता इंजेक्शन देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात आता थेट रुग्णालयातून रुग्णाला हा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिली आहे.
पुण्यात गेले काही दिवस सरसकट रेमडेसिविरच्या मागणीसाठी लोकांची गर्दी होत आहे. रुग्णालयाचे प्रीस्क्रिप्शन आणत लोक मेडिकलमध्ये गर्दी करत आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना इंजेक्शन मिळाले नाही
याबाबत राव म्हणाले, रेमडेसिविरच्या मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत आहे. शासकीय रुग्णालयात जर दोन रेमडेसिविर वापरले जात असेल तर खासगीमध्ये त्याचे प्रमाण १०० टक्के असल्याचे पाहायला मिळत आहे. रुग्णालयात दाखल असलेल्याला तेथूनच इंजेक्शन पुरवले गेले पाहिजे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे”.