पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मला महापौरपदाची संधी दिली, त्याबद्दल मी समाधानी आहे. मात्र, हे काम करीत असताना खूप त्रास झाला. प्रशासनाकडून कामे होत नसतील, तर महापौर पदाचे करायचे काय? मी वैतागले आहे. पवनाथडी जत्रेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे राजीनामा देणार आहे, अशी भावना महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केली. धराडे यांची निवड झाल्यापासून गटा-तटाचा शिक्का मारून राष्ट्रवादीतील स्थानिक नेते, पदाधिकारी त्यांना नेहमी पाण्यात पाहतात. टोमणे मारतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षाच्या निवडीत एका नगरसेविकेच्या पतिराजाने ‘आमचं-तुमचं’ केले होते. त्या वेळी महापौर रडकुंडीला आल्या होत्या. विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीयांनीही महापालिकेतील सभा असेल किंवा विकास कामांचा प्रश्न असेल, त्या वेळी त्रास दिला. प्रशासनाकडे वारंवार प्रश्न मांडूनही न्याय मिळत नसल्याची महापौरांची भावना आहे. त्यामुळे अनेक वेळा जनतेच्या, सामान्यांच्या प्रश्नासाठी संतप्त होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पवनाथडी जत्रेत होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारात महापौरांना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज झाल्या. त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे. आमचे नेते अजित पवार यांनी संधी दिली. पद स्वीकारल्यानंतर मी अधिकाधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, कामगार यांना माझ्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागासवर्गीय असल्याने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. महापौरपदी असतानाही प्रशासनाकडून वेळोवेळी वाईट अनुभव आले. महापौरांचे मत विचारात घेणार नसाल, तर या पदाचे करायचे काय? संधी मिळाल्याबद्दल मी निश्चितच समाधानी आहे. पिंपरीतील एचए मैदानावर पवनाथडी जत्रा होणार आहे. त्या सोहळ्यात पवारसाहेबांकडे राजीनामा देणार आहे.- शकुंतला धराडे, महापौर
महापौर म्हणतात, पदाचे करायचे काय?
By admin | Updated: February 10, 2016 03:25 IST