पुणे : मराठा क्रांती मूक मोर्चाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने संंयमाच्या मार्गाने सुरू असलेला मोर्चा चक्का जामसारख्या आंदोलनापर्यंत आला आहे. शासनाकडून निराशा झाल्याने मंगळवारी सकाळी ११ नंतर १ तासासाठी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केले जाणार असून कोणताही हिंसात्मक प्रकार होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आंदोलन केले जाणार आहे. शहरात येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर तसेच १० प्रमुख मार्गांवर चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिय्या देणार असून कोणालाही वेठीस धरले जाऊ नये, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. उद्याच्या चक्का जाम आंदोलनाच्या सूक्ष्म नियोजनासाठी आयोजकांच्या ४ बैठका झाल्या. मोर्चाच्या वेळी जसे नियोजन करण्यात आले होते, तसेच नियोजन या आंदोलनासाठीही केले गेले आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी मराठा क्रांती मोर्चे झाले. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा केली होती. मात्र त्या पातळीवर दिरंगाई झाली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असूनही शासनाने त्या थांबविण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत. अनेक पुरोगामी निर्णयांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात रास्त अपेक्षा असलेल्या समाजाच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. गरीब मुलांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जात नसल्याने समाजात नैराश्याची भावना आहे. मराठा विरुद्ध ओबीसी अशी तेढ जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे. अन्य समाजांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जात असून राज्यात असंतोषाचे वातावरण आहे. काही मंत्री मराठा मोर्चामध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही संयम ठेवला जावा, अशी अपेक्षा आहे. मात्र तो सुटल्यास शासनच जबाबदार असेल.पुणे शहरातील ठिकाणे१. भूमकर चौक वाकड२. पांजरपोळ, भोसरी ३. पिंपरी चौक, डॉ. आंबेडकर चौक४. मॅगझीन चौक,५. पर्णकुटी चौक, येरवडा ६. शेवाळवाडी फाटा, हडपसर जिल्ह्यातील ठिकाणे१. खेड शिवापूर टोलनाका २. तळेगाव चौक चाकण ३. राजेगाव दौंड ४. खडकी दौंड ५. केडगाव चौफुला दौंड ६. भिगवण ७. बावडा ८. भवानी नगर ९. इंदापूर १०. वालचंदनगर
मराठा मोर्चातर्फे आज चक्का जाम
By admin | Updated: January 31, 2017 04:47 IST