पुणे : महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या सहकार्याने पार पडलेल्या ११३व्या आगा खान चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत मराठा लाईट इन्फन्ट्री (एमएलआय) ‘अ’ संघाने रविवारी पुरुष गटात विजेतेपदाला गवसणी घातली. महिलांमध्ये नवी दिल्ली येथील जिझस अँड मेरी कॉलेज संघाने बाजी मारली. पिंपरी-चिंचवड येथील नेहरूनगर परिसरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या चुरशीच्या अंतिम फेरीत एमएलटी ‘अ’ संघाने लखनौ येथील के. डी. सिंगबाबू सोसायटी संघावर २-१ने मात केली, तर दुसरीकडे एकतर्फी झालेल्या सामन्यात आझम कॅ म्पस संघाला ५-०ने लोळवून जिझस अँड मेरी संघाने महिला गटाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.पुरुष गटात विजेत्या संघातर्फे दोन्ही गोल अक्षय जाधव याने केले. के. डी. सिंगबाबू संघाकडून एन. जेन जेन याने २५व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली होती. पूर्वार्धात ही स्थिती कायम होती. उत्तरार्धात वारंवार प्रयत्न करूनही एमएलआय संघाला गोल करता आला नाही. परिणामी, या संघावर दबाव वाढत होता. अखेर आकाश जाधवने ४६ व ४७ अशा २ मिनिटांच्या अंतराने २ गोल डागत सामन्याचे चित्र पालटवले.महिला गटात साई भोरिया व मानसी चौधरी यांनी प्रत्येकी २ गोल करीत, जिझस अँड मेरीज संघाला सहज विजेतेपद मिळवून दिले. उपांत्य सामन्यात हॅट्ट्रिक नोंदविणाऱ्या रूबी खोड हिने एक गोल करीत विजयात योगदान दिले. (क्रीडा प्रतिनिधी)
मराठा लाईट इन्फन्ट्रीचे विजेतेपद
By admin | Updated: September 26, 2016 03:20 IST