मढ : नगर-कल्याण महामार्गावरील पुणे, ठाणे व नगर या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषेजवळ पुणे व ठाणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा व निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या व विविध वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वास्तव्य असलेला डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला माळशेज घाट नेहमीच पर्यटकांचा व वनस्पतिशास्त्रज्ञांचा व गिरिभ्रमंतीकरांचा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.दर वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच माळशेज घाटात पर्यटकांची वाटचाल चालू होते. परंतु, या वर्षी जून महिना उलटूनही पावसाने दडी मारली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. माळशेज घाटात मोठा पाऊस झाल्याने घाटातील धबधबे वाहू लागले आहेत. येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पुण्यातील, तसेच मुंबईतील पर्यटक घाटात गर्दी करत आहेत. माळशेज घाटात वर्षाविहार करण्यासाठी मुंबई, कल्याण, नगर, नाशिक, पुणे या मोठ्या शहरांतून, तसेच जुन्नर, आळेफाटा, मंचर, नारायणगाव, संगमनेर, ओतूर या परिसरातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरात येत आहेत. माळशेज घाटातील मोठमोठाल्या धबधब्यांखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. माळशेज घाटात बोगद्यातून पुढे आल्यावर भगवान शंकर मंदिरासमोरील दरीमध्ये अलोट अशा नयनरम्य निसर्गाचे दर्शन घडत आहे. (वार्ताहर)
माळशेज घाट पर्यटकांनी बहरला
By admin | Updated: July 21, 2014 04:06 IST