पुणे शहरालगत असल्याने वाघोली गावाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हे गाव पालिकेत घेताना प्रशासनाला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक कामे करावी लागणार आहेत. आयुक्तांकडून २०२०-२१ चे अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे मांडण्यात येणार आहे. यामुळे वाघोलीसाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्याची मागणी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे ज्ञानेश्वर कटके यांनी केली आहे. वाघोली परिसराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. लोकसंख्या वाढल्याने पायाभूत, मुलभूत सुविधा पुरविण्याकरिता विकासकामांचा नियोजित आराखडा तयार करणे तसेच त्याअनुषंगाने निधीची तरतूद करणे गरजेचे ठरणार आहे. आयुक्त कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या वाघोलीसाठी विशेष तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे कटके यांनी सांगितले.
वाघोली परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकलेल्या आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. त्यामुळे आरक्षण टाकताना या गोष्टीचा विचार पालिका प्रशासनाने करावा, असा मुद्दाही मांडल्याचे जिल्हा परिषद सदस्य कटके यांनी सांगितले.
फोटो - ज्ञानेश्वर कटके