पुणे : विविध शाळांच्या विद्यार्थिनी, १९६५ ते १९९९ कालावधीत ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्यांची नावे लिहिलेली कागदी स्वरूपातील दहीहंडी, विशिष्ट तालबद्धतेत टाळ्या वाजवून आजी-माजी संमेलनाध्यक्षांचे स्वागत, वेगवेगळ्या कवितांचे तक्ते, साहित्यिकांची भाषणे याने हुजूरपागा प्रशालेतील संत ज्ञानेश्वर सभागृह साहित्यमय वातावरणाने भारावून गेले होता.निमित्त होते, एच.एच.सी.पी. हायस्कूल फॉर गर्ल्स हुजूरपागा आयोजित १०व्या शालेय मराठी साहित्य संमेलनाचे. या वेळी कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष द. भि. कुलकर्णी, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र गुर्जर, संस्थेचे उपाध्यक्ष पारखी, शकुंतला नवाथे, मुख्याध्यापिका अलका काकतकर, उपमुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी अहिल्यादेवी, सेवासदन, जिजामाता, कात्रज हुजूरपागा प्रशालेतील विद्यार्थिनी व शिक्षिका उपस्थित होत्या. एखादी मोठी गोष्ट बारकाईने समजून घ्यायची असेल, तर त्यातील लहानात लहान गोष्ट समजून घेणे गरजेचे असते. त्याप्रमाणेच मोठ्या संमेलनांची बीजे या शालेय संमेलनातच रोवली जातात, असे कुलकर्णी म्हणाले. दुसऱ्या सत्रात आपल्या जगण्याचा आणि समोरील दृश्याचा काय संबंध आहे हे शोधायला शिका, असा सल्ला युवा नाटककार धर्मकीर्ती सुमंत यांनी या वेळी दिला. अभिनेते आलोक राजवाडे यांनीही मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये सुनील मेहता यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
हुजूरपागा शाळेत रंगले साहित्य संमेलन
By admin | Updated: January 10, 2015 00:51 IST