पिंपरी : ‘चल गं सखे, चल गं सखे पंढरीला...’, ‘विठु माऊली तू माऊली जगाची...’, ‘माऊली माऊली रूप तुझे...’ अशा संतरचना आणि विठुरायाचे गोडवे गाणारे अभंग गात संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत सायंकाळी साडेपाचला प्रवेशला. वारीच्या वाटेवर निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे मनोभावे स्वागत केले. वैष्णवांचा मेळा सायंकाळी सव्वासातला आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात विसावला. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन वैष्णवांचा प्रवाह बुधवारी पंढरीकडे मार्गस्थ झाला. देहूतील इनामदारवाड्यात पहिला मुक्काम झाला. गुरुवारी सकाळी नऊला पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या हस्ते महापूजा केली. या वेळी प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, तहसीलदार किरणकुमार काकडे, संस्थानचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, सोहळाप्रमुख सुनील मोरे, अभिजित मोरे आदी उपस्थित होते. त्यानंतर पावणेअकराला इनामदारवाड्यातून सोहळा पुढे मार्गस्थ झाला. गावात प्रवेशणाऱ्या महाद्वारात आल्यानंतर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. यानंतर दुपारी बाराला अनगडशहा वली बाबा दर्ग्याजवळ अभंग आरती झाली. त्यानंतर सोहळा झेंडेमळामार्गे चिंचोलीत दुपारच्या विश्रांतीसाठी थांबला.देहू शस्त्रास्त्र भांडार आणि देहूरोडकरांच्या वतीने स्वागत झाल्यानंतर पुणे-मुंबई महामार्गाने सोहळा आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला. आजही ढगाळ वातावरण होते. तसेच, विठ्ठलभक्तीचे अभंग गात असतानाच पावसाच्या हलक्या सरी वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित करीत होत्या. उद्योगनगरीच्या प्रवेशद्वारावर अर्थात भक्ती-शक्ती चौकात महापालिका व प्राधिकरण, तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने स्वागत कक्ष उभारले होते. ध्वनिवर्धकावरून विविध भक्तीगीते आनंद द्विगुणित करीत होती. तर, भक्ती-शक्ती समूह शिल्पाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या ठिकाणी वारकरी सेल्फी काढण्याचा आनंद घेत होते. महापालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव यांनी स्वागत केले. दिंडीप्रमुखांना सतरंजीचे वाटप केले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे आदी उपस्थित होते. बारणे आणि लांडगे यांनी रथाचे सारथ्य केले. तसेच महापौरांनी महिला वारकरी आणि नगरसेविकांसमवेत फुगडीचा आनंद लुटला. शाळांची दिंडीपथकेही सोहळ्यात सहभागी झाली होती. त्यानंतर निगडीतील मंदिराजवळ काही काळ पालखीचा विसावा झाला. या वेळी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी लोटली होती. (प्रतिनिधी)
पालखी आगमनाने शहर चैतन्यमय
By admin | Updated: July 10, 2015 01:51 IST