पुणे : सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे रेशनचे धान्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व स्वस्त धान्य दुकानांमध्ये ‘काळ्याबाजारा’ने थेट रॉकेल व धान्याची विक्री करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचा व त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिले आहेत. दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी संबंधित सर्व परिमंडल अधिकाऱ्यांना नोटिसा देऊन काळ्याबाजारासंदर्भात दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.पुणे जिल्ह्यात आणि शहरी भागात सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या धान्याची स्वस्त धान्य दुकानदारांकडून दुकानांमध्येच सर्रास काळ्याबाजाराने थेट विक्री केली जात असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. नागरिकांना दोन व तीन रुपये दराने मिळणारे रेशनिंगचे धान्य या दुकानदारांकडून पाच ते सहा पट दर आकारून थेट दुकानांमध्येच काळ्याबाजाराने विकले जाते. शासनाने रॉकेलचा कोटा कमी केल्याचे सांगून रेशनकार्डधारकांना हक्काचे रॉकेल देण्यास नकार देणारे दुकानदार काळ्याबाजात पाच पट नफा घेऊन राजरोस ते विकत असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. ग्रामीण भागात कोणत्याही स्वस्त धान्य दुकानामध्ये असा प्रकार होत असेल, तर पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधा व तक्रार करा. धान्याचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्याच ठिकाणी परवाना रद्द करून त्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने रद्द
By admin | Updated: July 10, 2015 02:25 IST