लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : शासनदरबारी दुधाचे प्रश्न सोडवण्यासाठी खेड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ अभियानांतर्गत शेकडो पत्रे थेट दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना पाठवून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. दूध उत्पादकांनी पाठविलेल्या पत्रांमध्ये विविध मागण्याही नमूद करण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य समिती दूध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. तसेच अन्य दूध उत्पादक शेतकरीही वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीसुद्धा शासनदरबारी दुधासंदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, कार्याध्यक्ष माजी आमदार जिवा गावीत व राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी थेट दुग्धविकास मंत्र्यांना शेकडो पत्र लिहून पाठवून दूध प्रश्न लक्षवेधी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दुग्धविकास मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ६० रुपये दर द्यावा. लॉकडाऊन काळातील लूटवापसी म्हणून शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे. खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करावा. दुधाला एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे कायदेशीर संरक्षण द्यावे. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी ‘एक राज्य एक ब्रँड’ हे धोरण स्वीकारावे. भेसळ मुक्तीची कायदेशीर हमी द्यावी. सदोष मिल्को मिटर द्वारे होणारी लुट थांबविण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करावी. शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरु करावा. राज्यात दुध मूल्य आयोगाची स्थापना करावी अशा मागण्या उत्पादकांनी केल्या आहेत. या अभियानाचे संयोजन खेड किसान सभा तालुका समितीचे अमोद गरुड, महेंद्र थोरात, विकास भाईक, किसनराव ठाकूर, भाऊसाहेब सरडे आदींनी केले.
फोटो ओळ : दुधासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी दुग्धविकास मंत्र्यांना पत्र पाठविताना खेड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)