नारायणगावजवळील कोल्हेमळ्यात रवींद्र कोल्हे यांच्या उसाच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला.
कोल्हमळा येथे बिबट्याला पकडण्यासाठी २० दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्यासाठी भक्ष्य ठेवले होते. मात्र, बिबट्या सतत गुंगारा देत असल्याने पिंजऱ्याची जागा २ ते ३ वेळा बदलण्यात आली. वनरक्षक रामेश्वर फुलवाड व खंडू भुजबळ हे दोघेजण रोज सकाळी बिबट्या अडकला की नाही हे पाहण्यासाठी पिंजरा लावलेल्या ठिकाणी जात होते. पिंजऱ्याच्या जवळपास बिबट्याचे ठसे दिसून येत होते. मात्र बिबट्या पिंजऱ्यात अडकत नव्हता. रविवारी सकाळी ७.३०च्या सुमारास फुलवाड व भुजबळ हे पिंजऱ्याजवळ गेले असता पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडल्याचे लक्षात आले. पिंजऱ्यात पाहिले असता त्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. बिबट्या नर जातीचा असून ९ वर्षाचा आहे.
पिंजरा लावलेल्या शेतात पावसामुळे चिखल झाल्याने पिंजरा शेतातून बाहेर काढायला उशीर झाला. दरम्यान,बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व मुलांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली. चिडलेल्या बिबट्याने पिंजऱ्याला धडका मारल्या.यामुळे बिबट्याच्या डोक्याला जखम झाली असून त्याला उपचारांसाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
कोट
सध्या ऊसतोड सुरू आहे,त्यामुळे बिबट्यांची लपण कमी झाल्याने ते आता मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. नागरिकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बिबट्या दिसल्यास त्याचे फोटो किंवा शूटिंग करण्याचा प्रयत्न करू नये शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटे न जाता हातात काठी व बॅटरी ठेवावी." -
मनीषा जितेंद्र काळे, वनपरिमंडल अधिकारी, नारायणगाव ================================
कॅप्शन : कोल्हेमळ्यात पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या