लोकमात न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : तिन्हेवाडी (ता.खेड) येथे डेअरीला दुध पोहोचवून दुचाकीवरून घरी निघालेल्या एका दूध व्यावसायिकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरूवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. बिबट्या दुचाकीच्या मागील बाजुला धडकला. नशिब बलवत्तर असल्याने ते बचावले. या घटनेमुळे या परसरात दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वसंत उर्फ दत्तात्रय भगवंत आरुडे असे बिबट्याच्या हल्यातून बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना
आरुडेवाडीच्या टेकडी वस्तीकडे जाणाऱ्या सातकरस्थळ -आरुडेवाडी पाणंद रस्त्यावरील ओढ्याच्या पुलावर घडली. वसंत आरुडे हे दुध घालुन घरी निघाले होते. रस्त्यावरील विजखांबाचे दिवे सुरू होते. ओढ्याच्या पुलावर आल्यावर बाजूने अचानक डरकाळीचा आवाज आला. त्याबरोबर बिबट्याने आरुडे यांच्यावर झेप घेतली. ही झेप किंचित चुकली. आरुडे यांनी दुचाकी जोरात चालवुन पुढे घर असलेल्या ठिकाणी जाऊन मागे पाहिले. तर बिबट्या त्याच ठिकाणी गुरगुरत फिरत असल्याचे त्यांना दिसले. वसंत आरुडे यांनी जवळच्या लोकांना बोलावून आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्या अंधारात गायब झाला. या घटनेमुळे तिन्हेवाडी परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असुन वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी तिन्हेवाडीचे सरपंच अरुण थिगळे केली आहे.
चौकट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या वतीने या परिसरात जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवाय गरज असल्यास पिंजरा लावण्यात येईल. सध्यातरी तिन्हेवाडी, कोहिणकरवाडी,सातकरस्थळ परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगे यांनी केले आहे.