पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दर वर्षीप्रमाणेच यंदा देखील पारंपरिक वाद्ये व डीजेचा थरार यांनी लक्ष्मी रस्ता दणाणून सोडला. पथकांची संख्या कमी करूनदेखील अवाढव्य ढोल-ताशा पथकांमुळे यंदा मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत देखील ध्वनिप्रदूषणाने कमालीची उंची गाठली होती. परंतु, संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचा विचार करता गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषणामध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले.पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यावरील १० चौकात दर चार तासांच्या अंतराने रविवार दुपारी १२ ते रात्री १२ व दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. यामध्ये सर्वांधिक १०४.१ डेसिबल्स आवाज रात्री ८ ते १२ या कालावधीत नोंदविला गेला. तर, लिंबराज महाराज आणि कुंटे चौकात सरासरी आवाजाची शंभरी ओलांडली. नामांकित आणि अवाढव्य ढोल-ताशे पथकांमुळे दिवसादेखील आवाजाची पातळी अधिकच आढळून आली. मानाच्या गणपतीसमोरील ढोल-ताशाचा दणदणाट दुपारी बारा ते चारदरम्यान शंभर डेसिबल्सच्या पुढे होता. तर, रात्री १२ नंतर उच्च न्यायालयाची मर्यादा असूनही मंडळाचा आवाज जवळपास तेवढाच असल्याची नोंद झाली. यंदा सरासरी आवाज १०४ डेसिबल्स इतका नोंदविण्यात आता. गत वर्षी हाच आवाज ११५ डेसिबल्स इतका होता. विद्यार्थी कल्याण मंडळाचे मुरली कुंभारकर यांच्या नेतृत्वाखाली सदानंद करुकवाड, अतुल इंगळे, नीलेश वाणी, रोहित गावडे, अवधूत जाधव आणि दिनेळ वाळुंजे या विद्यार्थ्यांनी रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. -----------मिरवणूक शांततेतपोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि पोलीस मित्र, सामाजिक संघटनांची पोलिसांना झालेली मदत, यामुळे शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. पोलिसांच्या चारही परिमंडलांसोबत मुख्य विसर्जन मार्गांवरील मिरवणुका किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडल्या. मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये दर वर्षी होणारा संघर्ष या वर्षी टाळण्याचा पोलिसांचा प्रयत्न यशस्वी ठरला. मानाच्या गणपतींचे विसर्जन व्हायला उशीर झाल्यामुळे पोलिसांना विसर्जन मिरवणूक लांबण्याची भीती वाटत होती. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही मिरवणूक २० मिनिटे आधी संपवण्यात यश आले. पोलिसांनी मंडळांना कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकल्याने तसेच बंधने न घातल्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांची चंगळ झाली. मानाच्या गणपतींना तीन पथकांना, तर अन्य मंडळांना दोन पथकांना परवानगी देण्यात आली होती. परंतु बहुतेक मंडळांनी तीन पथके मिरवणुकीमध्ये उतरवली होती. परंतु पोलिसांनी मंडळांना कोणतीही आडकाठी केली नाही. पोलिसांनी केवळ सुरक्षा आणि गर्दीचे नियंत्रण या दोनच गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. मंडळांवर कोणतेही नियंत्रण पोलिसांनी ठेवलेले नव्हते. गर्दीचे नियंत्रण करण्यामध्ये पोलीस मित्र आणि कार्यकर्त्यांची मोठी मदत पोलिसांना झाली. बेलबाग चौकात स्वत: पोलीस आयुक्त के. के. पाठक, सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त (विशेष शाखा) श्रीकांत पाठक, तुषार दोषी, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी बंदोबस्ताचे नियंत्रण करीत होते. तर टिळक चौकामध्ये अतिरिक्त आयुक्त पी. एन. रासकर, उपायुक्त (गुन्हे) पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता. साडेतीन हजार पोलीस व ३ हजार स्वयंसेवकांच्या मदतीने गणेशोत्सवाची सांगता शांततेत झाली.
लक्ष्मी रस्त्यावर यंदाही ‘दणदणाट’
By admin | Updated: September 29, 2015 01:54 IST