पुणे : इमारतीच्या सेंट्रिंगचे काम करत असताना पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना येवलेवाडीतील निर्मल स्केअर साईटवर घडली. कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह मजूर ठेकेदाराविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलकमल गुरुगोपाल चक्रवर्ती (वय ४३, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) असे मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव आहे.
याप्रकरणी आनंदा बादल घोष (वय २९, रा. वाघजाईनगर, भोर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मनीलाल गोविंद राठोड आणि अजय सत्यनाथ मिस्त्री यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
येवलेवाडीतील निर्मल स्केअर बांधकाम साईटचे काम सुरू आहे. तेथे १७ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम सुरू होते. त्या वेळी निलकमल काम करीत असताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. बांधकामाच्या वेळी कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही खबरदारी न घेतल्याप्रकरणी दोन्ही ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तपास करीत आहेत.