डिंभे : कुकडी प्रकल्पांतर्गत येणा-या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होऊ लागली आहे. आवर्तन सुरू आहे याचा परिणाम धरणसाठे खाली होण्यावर होऊ लागला आहे. कुकडी प्रकल्पात आज १०.८८९ टीएमसी (३५.६६ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी हाच साठा १६.१०७ टीएमसी म्हणजेच ५२.७५ टक्के एवढा शिल्लक होता. मागील वर्षाच्या तुलनेत ६ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. शिल्लक पाणीसाठ्याचा काटकसरीने व नियोजनपूर्वक वापर न झाल्यास पुढील काही दिवसांत तीव्र पाणीटंचाईला समाोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव; तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार होतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यांतील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण सात तालुक्यांमधील सुमारे १५६२७८ एवढे मोठे क्षेत्र कालव्यांद्वारे सिंचनाखाली येत आहे. मागील वर्षाची तुलना करता यंदाच्या उन्हाळ्यात प्रकल्पातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या उन्हाळी रोटेशन सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत हे रोटेशन सुरू राहणार आहे. आतापर्यंत २ रब्बीसाठी व १ खरिपासाठी प्रकल्पातून आवर्तने पूर्ण केली आहेत. (वार्ताहर)
‘कुकडी’ अर्धी रिकामी
By admin | Updated: February 24, 2015 00:29 IST