पेठ : पेठ-घोडेगाव रस्त्यावर कुरवंडी (ता. आंबेगाव) गावाजवळील घाटानजीक असलेला कोटमदरा पाझर तलाव नुकत्याच झालेल्या पावसाने ७० टक्के भरला आहे. घाट परिसरातील निसर्गरम्य सांैदर्य पाहण्यासाठी खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यांतील पर्यटकांची गर्दी वाढली आहे.गेल्या आठवड्यात सातगाव पठार परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे ओढ्यानाल्यांना पाणी आले होते. तसेच, कुरवंडी घाटातील कोटमदरा पाझर तलावही ७० टक्के पाण्याने भरला आहे. येथील पाझर तलावातील पाण्याचा फायदा कोटमदरा, पिंगळवाडी परिसरातील शेतीला व पिण्यासाठी नागरिकांना झाला आहे. परिसरातील १०० एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. ७० विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. कालदरा पाझर तलावात पाणी आल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे. कालदरा पाझर तलाव घोडेगाव-पेठ रस्त्यावर आहे. पाझर तलावाचा आकार भारत देशाच्या नकाशासारखा आहे. पाझर तलाव व घाट परिसरातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी लहान मुले, नागरिक व महिला पर्यटकांची गर्दी वाढत आहे.(वार्ताहर)
कोटमदरा तलाव ७० टक्के भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2015 00:12 IST