जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त दीड लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले, तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरीत मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भाविक आपआपल्या प्रासादिक शिखरकाठ्यासह जेजुरीला येऊन देवदर्शन घेत असतात. दर चार वर्षांनी कोकणातील कोळी बांधवही आपआपल्या पालख्या घेऊन जेजुरीस येतात. या वर्षी जेजुरीत कोळी बांधवासह शिखरी काठ्याच्या समवेत आलेल्या भाविकांची कालपासून मोठी गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर राज्यभरातून इतरही भाविक देवदर्शनासाठी जेजुरीत आलेले आहेत. आज सायंकाळी कोळी बांधवांच्या पालख्यांनी जेजुरी गडावर जाऊन देवभेट घेतली. या वेळी ऐतिहासिक चिंचबाग ते खंडोबा गडापर्यंत भाविकांनी पालख्यांची मिरवणूक काढली होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात, कोळीनृत्य व कोळीगीतांच्या तालावर भंडार खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करण्यात येत होती. रात्री उशिरा गडावर कोळी बांधवांनी पालख्यासह देवदर्शन घेतले.उद्या बुधवारी (दि. ४) शिखरी काठ्यांच्या देवभेटीचा सोहळा रंगणार आहे. हा सोहळा नेहमीच वादग्रस्त राहिल्याने पोलिसांनीच सोहळ्यातील मानकरी संगमनेरकर होलम आणि सुपेकर खैरे यांना एकत्र बसवून वर्षा आड देवभेटीचा प्रथम मान देण्याचा तोडगा काढला असल्याने यंदा सकाळी ९ ते ११ या वेळेत संगमनेरकर होलमांची मानाची शिखरकाठी सोबतच्या प्रासादिक शिखरकाठ्यासह गडावर जाऊन देवभेट घेणार आहेत. तर दुपारी २ ते ५ या वेळेत सुपेकर खैरे यांची मानाची शिखरकाठी देवभेटीला जाणार आहे. सकाळीच स्थानिक होळकरांची शिखरकाठीही देवभेट घेणार आहे. यात्रेनिमित्त आज जेजुरी पोलिसांनी रहदारीचे नियोजन अत्यंत नेटके केल्याने वाहतुकीची कोंडी अजिबात जाणवली नाही. गडावरील दर्शन पास आज बंद ठेवल्याने रांगेतील भाविकांचेही दर्शन अत्यंत सुलभ झाले होते. पायरी मार्गावरील तसेच गडाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे हटवल्याने तसेच शहरात चारचाकी वाहनांना बंदी केल्याने भाविकांना अत्यंत मोकळ्या वातावरणात देवदर्शन घेता आले. जेजुरी पोलीस ठाण्याचे स.पो. नि. रामदास शेळके यांनी रहदारीच्या केलेल्या अत्यंत नेटक्या नियोजनाचे कौतुक भाविक तोंड भरून करीत होते. विशेष म्हणजे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी पोलिसांच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या राहुट्या उभारण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
जेजुरीत कोळीबांधवांनी घेतली कुलदैवताची भेट
By admin | Updated: February 4, 2015 00:09 IST