लोणी काळभोर : ग्रामपंचायत कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील घोरपडेवस्ती परिसरांत राहत असलेल्या एका परप्रांतीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण करण्यात आले असल्याने या परिसरांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात ऊलेस तानाजी सारथी (सध्या रा. घोरपडेवस्ती, लोणी स्टेशन, मूळ रा. सराईभदर, ता. छतमुरा, जि. रायगड, छत्तीसगड) यांनी आपला मुलगा शिवा ऊलेस सारथी (वय ७) याचे अज्ञात कारणांवरून अपहरण करण्यात आले असल्याची फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊलेस सारथी लोणी स्टेशन येथील सिमेंट मालधक्क्यांवर काम करतात. ते आपल्या कुटुंबीयांच्यासमवेत घोरपडेवस्ती येथे राहतात. सोमवारी (दि. १) दुपारी ३ वाजेपर्यंत शिवा घराच्या आसपास खेळत होता. त्यानंतर तो दिसला नाही, म्हणून त्याच्या आईने परिसरात शोध घेतला. बराच वेळ शोधूनही तो न सापडल्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या़पती रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी आल्यानंतर तिने मुलगा दुपारपासून घरी आला नसल्याचे सांगितले. नंतर त्यानेही नातेवाईक, मित्र आदींकडे चौकशी केली, परंतु कसलीही माहिती न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस हवालदार एस. जे. यादव करीत आहेत. (वार्ताहर)
लोणी काळभोरला परप्रांतीय अल्पवयीन मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 03:34 IST