लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वातावरणात बदल घडून संततधार पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामातील पेरणीयुक्त पिकांना दिलासा मिळू लागला आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या हलक्या संततधार पावसामुळे परिसरातील तहानलेली शेती तृप्त होण्यासही मदत होत आहे. उन्हाळी हंगामात ऊस तसेच अन्य पिके पाण्याअभावी अडचणीत आली होती. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी पावसाची खूप गरज निर्माण झाली होती. पावसाळी हंगामाच्या तोंडावरच वरुणराजाने तारल्याने पिकांना नवसंजीवनी मिळली असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.खरीपपूर्व वळवाच्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे मार्गी लावली होती. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भुईमूग, बाजरी, मूग, वाटणा, वाल, कडधान्ये, पालेभाज्या या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. या पेरणीयुक्त पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत गरज होती. मात्र, मागील एक-दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून मॉन्सूनच्या पावसाची चाहूल लागली होती. सोमवारी रात्रीपासून खेडच्या पूर्व भागातील शेलगाव, दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव, वडगाव घेनंद, मरकळ, गोलेगाव, बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, नवीनगाव, मोहितेवाडी, चिंचोशी, आळंदी, सोळू, धानोरे, चऱ्होली आदी गावांसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मॉन्सूनचा मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरिपातील बहुतांशी सर्वच पेरणीयुक्त पिकांना फायदा होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
खरीप पिके होणार टवटवीत
By admin | Updated: June 28, 2017 03:57 IST