पुणे : भारतीय चित्रपटांचे जतन व संवर्धन करण्याचे आगार मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात अभिजात, ख्यातनाम जागतिक चित्रपटांची भर पडली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलसह अॅकॅडमी विजेते, गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्ड, द ब्रिटिश अॅकॅडमी फिल्म अॅवॉर्ड आणि रॉबर्ट अॅवॉर्ड प्राप्त विजेत्या चित्रपटांच्या संपादनामुळे संस्थेची राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट संग्रहालय अशी नवीन ओळख निर्माण होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. एनएफएआय विविध देशांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून त्या त्या देशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि राजदूतांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर भर देत आहे. त्याच्याच परिणामस्वरूप गाजलेल्या परदेशी चित्रपटांचा हा अमूल्य ठेवा संग्रहालयाला उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. संस्थेच्या अभिजात चित्रपटांच्या खजिन्यात फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, बोस्निया, हर्जेगोविना आणि इराण आदी देशांचे चित्रपट समाविष्ट झाले आहेत. लेमिंग २००५, इन्व्हेशन्स बार्बर्स २००३ आणि द बिट दॅट माय हार्ट स्किप २००५ (फ्रान्स), इन्फंट २००५ (बेल्जियम), काँगकाबले २००४ (डेन्मार्क), गोरी वाट्रा (हर्जेगोविना) या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश आहे. मुंबईतील इराणी दूतावासाकडून इराणी चित्रपटही संस्थेने संपादित केले आहेत. प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक मोहसेन मखमलबफ्सचा गाजलेला चित्रपट द पेडलर (१९८९), द अफगाण अल्फाबेट २००२ लघुपट तसेच पुरान दरखशानदेहचा ‘वेट ड्रीम (२००५) आणि शहराम असिद्दी यांचा ‘अविनार’ (१९९१) हे चित्रपट संस्थेला मिळाले आहेत. (प्रतिनिधी)
जागतिक चित्रपटांचा ठेवा पुण्यात
By admin | Updated: March 22, 2017 03:27 IST