दावडी : कनेरसर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव खचला असून, पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे.पुलाला मोठमोठे भगदाड पडले असून, या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी कनेरसरचे माजी सरपंच जवाहर दौंडकर, काळुराम दौंडकर यांनी केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर व शिरूर तालुक्यातील केंदूर व परिसरातील गावांना जोडणारा कनेरसर-केंदूर हा जवळचा रस्ता आहे. तसेच हा रस्ता कनेरसर गावात जातो. गावात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, आरोग्य उपकेंद्र व मोठी लोकवस्ती असल्याने या पुलाचा उपयोग होत असून, या ठिकाणी नेहमीच वाहनांची व नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची या पुलावरून ये-जा सुरु असते. कनेरसर येथे सेझ प्रकल्प असल्याने हा रस्ता नेहमीच वर्दळीचा बनला आहे. ओढ्यावर जुना दगडी पूल आहे. या पुलावरून या परिसरात कंपन्यांच्या कच्च्या मालाची वाहतूक याच रस्त्याने सुरु असते. पुणे, वाघोली, कोरेगाव भीमा येथे जाण्या-येण्यासाठी केंदूर-कनेरसर हा जवळचा रास्ता आहे,काही महिन्यांपूर्वी पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले होते, त्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकादायक झाला होता. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कनेरसरच्या पुलाला भगदाड; वाहतुकीस धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:45 AM