पुणे : सतारीवर सफाईदारपणे आणि विद्युत वेगाने फिरणारी बोटे, त्यातून उमटणारे जादुई सुरेल सप्तसूर यांमुळे प्रेक्षागृहाला स्वरमहालाचे स्वरूप आले. मनाला भिडणाऱ्या आणि सुरेल विश्वाची सफर घडवणाऱ्या सदाबहार वादनाने रसिक स्वरविश्वात तल्लीन झाले. गायकी अंगाने वाजविणारे सतारवादक अशी ओळख असणारे उ. उस्मान खान यांच्या सतारीच्या झंकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ व्हायोलिनवादक उ. फैयाज हुसेन खान यांच्या वादनाने रसिकांना श्रवणानंद दिला आणि रविवारची सायंकाळ खऱ्या अर्थाने ‘सूरदायी शाम’ ठरली.गानवर्धन संस्थेने ज्येष्ठ सतार वादक उस्ताद उस्मान खान व ज्येष्ठ व्हायोलिन वादक उस्ताद फैयाज हुसेन खान या दोन बुजुर्ग कलावंतांच्या सतार व व्हायोलिन वादनाच्या अनोख्या जुगलबंदीचे रविवारी बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. सुचेता नातू यांच्या स्मरणार्थ कीर्तन संजीवन पुष्पलता रानडे पुरस्कृत असा हा कार्यक्रम होता.सतार-व्हायोलिन जुगलबंदीला तबल्यावर पं. अरविंदकुमार आझाद यांनी सुरेल साथसंगत केली. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या हस्ते सुरेश रानडे, जयश्री रानडे, कृ. गो. धर्माधिकारी, रवींद्र दुर्वे आदींच्या उपस्थितीत उस्ताद उस्मान खान व उस्ताद फैयाज हुसेन या ज्येष्ठ कलाकारांच्या विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन दयानंद घोटकर यांनी केले. ‘बहार आयी मेरे मैखाने में’ असे म्हणत पं. फय्याज हुसेन खान यांनी अत्यत विनम्रतेने रसिकांचे स्वागत केले. राग पुरिया कल्याणने मैफलीला प्रारंभ झाला. पं. अरविंदकुमार आझाद यांनी तबल्यावर साथ देत मैफलीला चार चांद लावले. (प्रतिनिधी)रसिकांनी कामाची दखल घेतल्यास अधिकाधिक उत्तम काम आणि संगीताची साधना करण्याची प्रेरणा मिळते. आजच्या मैफलीतही प्रेमाने प्रत्येक रागाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.- पं. उस्ताद उस्मान खानप्रत्येक कलाकार हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. त्यामुळे सर्वतोपरी चांगले ज्ञान ग्रहण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या ज्ञानाचा नवीन कलावतानाही लाभ व्हावा, हीच इछा आहे.- पं. फय्याज हुसेन खानआज या जुगलबंदीच्या निमित्ताने दोन कलांचा मिलाफ ऐकण्याचा दुर्मिळ योग रसिकांना लाभला आहे. कोणताही गाजावाजा न करता संगीताची अविरत साधना करत या दोन दिग्गज कलाकारांनी अभारतीय रसिकांना भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी लावण्याचे काम केले आहे. तसेच, विद्यादानाचे पवित्र कामही हाती घेतले आहे.- प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका
घडली सुरेल विश्वाची सफर
By admin | Updated: May 23, 2016 01:26 IST