पुणे : स्वारगेटजवळच्या चौकातील रेंगाळलेल्या देशभक्त केशवराव जेधे उड्डाणपुलाचे उद््घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या हस्ते आज (शुक्रवारी) सकाळी ७ वाजता होत आहे. उद््घाटन झाल्यानंतर नागरिकांना लगेचच दिवसभर पुलाचा वापर करता यावा, यासाठी खुद्द पवारांनीच हा सकाळचा मुहूर्त महापौर प्रशांत जगताप यांना निश्चित करायला लावला आहे.महापालिकेच्या स्थायी समितीने एप्रिल २०१३मध्ये या पुलाच्या कामाला मान्यता दिली. प्रत्यक्ष काम १० जून २०१३ रोजी सुरू झाले. पुलाचा एक भाग यापूर्वीच पूर्ण झाला होता. सातारा रस्त्यावरून येणाऱ्या भागाचे काम बाकी होते. तेही आता पूर्ण झाले आहे. सुरुवातीला फक्त ९० कोटी रुपये खर्च असलेल्या या पुलाला काम पूर्ण होताना १५७ कोटी रुपये लागले आहेत. त्यात प्रत्यक्ष पुलाच्या कामाचे ९९ कोटी व पादचारी पूल, अंडरपास वगैरे कामाचे २८ कोटी व अन्य कामांसाठी उर्वरित, असा खर्च झाला आहे.मध्यंतरी काही महिने पुलाचे काम रेंगाळले होते; मात्र आता ते पूर्ण झाले असून पूल उद्यापासूनच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. या पुलामुळे आता स्वारगेटच्या चौकात नेहमी होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. सातारा रस्त्यारून येणारी व शंकरशेठ रस्त्याला जाणारी सर्व वाहने आता थेट शहरांतर्गत रस्त्यावरून न येता पुलावरून जातील. त्यामुळे चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीला आळा बसले, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)काही स्वयंसेवी संस्थांनी पुलाचा एक खांब चुकीच्या पद्धतीने लागला असल्याची तक्रार केली होती; मात्र तज्ज्ञ संस्थांकडून त्याची तपासणी करून घेतल्यानंतर त्यात काहीही धोका नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला असल्याची माहिती महापौरांनी दिली.
जेधे उड्डाणपुलाचे आज उद््घाटन
By admin | Updated: May 27, 2016 04:47 IST